समर्थ संप्रदायातील भक्तांची अशी श्रद्धा आहे की समर्थ रामदास हनुमंताचे अवतार होते. समर्थांची हनुमानभक्ती मात्र त्यांच्या वाङ्मयात पानोपानी प्रकट झाली आहे. लहानपणी सर्वच मुलांना हनुमंताचे आकर्षण असते. समर्थ लहानपणी आपल्या दंडाला हनुमंताचा ताईत बांधत असत. त्यांचा तो दंडातला मारुती आजही जांबेत पाहायला मिळतो. लहान मुलांना पराक्रमामुळे हनुमंत प्रिय असला तरी संत वाङ्मयात हनुमंताला स्थान आहे, ते त्याच्या दास्यभक्तीमुळे. भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे संत हनुमंताला 'भक्तीच्या वाटा मला दाखव' अशी विनंती करतात. तेव्हा हनुमान हे भक्तीचे प्रतीक आहे. समर्थांनी हनुमंताचा उपयोग भक्ती आणि शक्ती यांच्या समन्वयासाठी केला.
समर्थांनी हनुमंताची हजारो मंदिरे उभी केली. त्यांची हनुमान मंदिरे दोन प्रकारची होती. जो हनुमान रामासमोर उभा आहे, तो हात जोडून दासाप्रमाणे उभा आहे. हा दासमारुती भक्तीचे प्रतीक आहे. जिथे एकट्या हनुमंताचे मंदिर आहे, तिथे हनुमंताच्या पायाखाली राक्षस दाखवला असून हनुमंत त्याला बदडून काढीत आहे असे दिसते. हा वीरमारुती शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या हनुमंताच्या आरतीत 'रामी रामदासा शक्तीचा बोध' असे समर्थांनी स्पष्टपणे म्हटले आहे. याचा अर्थ, दुबळा समाज बलशाली करण्यासाठी समर्थांनी हनुमंताचा वापर केला. समर्थांनी निर्माण केलेली हनुमंतांची मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळा होत्या. एका व्याख्यानात स्वामी विवेकानंद म्हणाले- 'करा बघू जागोजागी हनुमंताची स्थापना! सगळे राष्ट्र कसे निवीर्र्य झाले आहे.' हनुमंत केवळ शक्ती आणि भक्तीचा समन्वय नाही. तर तो शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे.
संमर्थांना हनुमंताचा फार आधार वाटत होता. कारण त्यांचे वडील सूर्याजीपंत, बंधू गंगाधरपंत आणि स्वत: समर्थ या तिघांना हनुमंताचे दर्शन झाले होते. लहानपणी समर्थांना रामांनी अनुग्रह दिला आणि येथून पुढे हनुमान तुम्हाला सांभाळेल असे सांगितले. म्हणून समर्थांना हनुमंताचा खूप आधार वाटत होता. हनुमंताचे समर्थांवर खूप उपकार होते. या उपकारांचे उतराई होण्यासाठी समर्थांनी हनुमंताची एकवीस स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांवरून असे स्पष्ट दिसते की समर्थांच्या मते हुनमान हा समाजाचा संरक्षणमंत्री आहे. एक राष्ट्रीय दैवत म्हणून समर्थ हनुमंताची प्रतिमा उभी करतात.
समर्थ लिहितात :
' स्वधामासी जाता महारामराजा। हनुमंत तो ठेविला याचि काजा।
सदासर्वदा रामदासासी पावे। खळे गांजिता ध्यान सांडोनी धावे।
याचा अर्थ रामाच्या ध्यानात मग्न असलेला हनुमान भक्तावर संकट आले म्हणजे ध्यान बाजूला ठेवतो आणि धावत जातो. समर्थांना तत्कालीन विपरीत परिस्थितीत हनुमंतानेच सांभाळले आहे. म्हणून ते म्हणतात...
तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे।
म्हणउनि मन माझे रे तुझी वास पाहे।
मज तुज नीरवीले पाहिजे आठवीले।
सकळिक निजदासांलागी सांभाळविले।।
समर्थांची हनुमंताला ही विनवणी आहे की तुझ्या शक्तीचा एक अंश तू आम्हाला दे. हनुमंताकडे शक्तीचा प्रचंड साठा आहे. तेव्हा त्याने त्यातला थोडा वाटा आम्हाला द्यायला हरकत नाही, असाही शेरा ते मारतात. एवढेच नव्हे तर तू कंजुषपणा करू नकोस, जरा मनाचा मोठेपणा दाखव असे सांगतात. ही स्तोत्ररचना केली त्यावेळी समर्थांना कफाची व्यथा होती. या स्तोत्रपठणाने त्यांची कफाची व्यथा दूर झाली. म्हणून काही कफपीडित समर्थभक्त कफावरील उपाय म्हणून या स्तोत्राचा उपयोग करतात.
समर्थांनी हनुमंताची कितीही स्तोत्रं लिहिली असली तरी 'भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती' हे त्यांचे स्तोत्र सर्वात लोकप्रिय ठरले. त्यांनी स्थापन केलेले अनेक मारुती या स्तोत्रातील वर्णनानुसार आहेत. 'पुच्छ ते मुडिर्ले माथा, किरीटी कुंडले बरी। सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकीणी नागरा।' असे मारुतीचे ध्यान आढळते. एका स्तोत्रात समर्थांनी बहे बोरगाव येथील हनुमंताची पौराणिक कथा दिली आहे. समर्थांनी हजारो मारुतीमंदिरे स्थापिली असली तरी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील त्यांचे अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. या एकवीस स्तोत्रांपैकी अकरा स्तोत्रे अकरा मारुतींची आहेत. कोणत्या हनुमंताचे वर्णन कोणत्या स्तोत्रात आहे हे सांगणे मात्र कठीण आहे. हनुमंताचे चरित्र सांगणे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणे हा या स्तोत्रांपाठीमागचा प्रमुख हेतू दिसतो.
- सुनील चिंचोलकर