ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर भावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥

वाच्यार्थ:
भ्रमामुळेच मी आहे, भ्रमामुळेच तु आहेस...भ्रमामुळेच उपासक भासत आहेत....भ्रमातुनच ईश्वर जाणवतो आहे...खरोखरीच हे जगच भ्रममूल आहे...

लक्ष्यार्थ:
"मी आहे" हाच एक आपल्याला झालेला अस्तित्वात्मक भ्रम आहे...त्यातूनच "तू आहेस" अर्थात मी आणि तू वेगळे आहोत असा भ्रम उत्पन्न झालेला आहे....खरेतर मी काय आणि तू काय ईश्वराचेच अंश आहोत...त्याचेच व्यक्त स्वरूप आहोत...
पण मी आहे च्या भ्रमातूनच उपासक, अर्थात साधक, आस्तिक आणि नास्तिक असे भ्रमात्मक भेद आपल्याला ज्ञात झालेले आहेत...मी साधक या भ्रमातूनच परमेश्वर वेगळा, अर्थात जाणीवस्वरूप भासतो आहे....

हे सर्व स्वाभाविकच आहे कारण हे जगच मुळी भ्रममूल आहे...

इथे अस्तित्वच नसलेल्या मूळमायेला मी कोण असा प्रश्न पडला तेंव्हा ती जगदाकारे व्यक्त होऊन पाहू गेली...."अहम् ब्रह्मास्मि" मीच ब्रह्म आहे असा भ्रम तिला/त्याला झाला....आणि त्यातूनच रोज नवे काहीतरी उत्पन्न करून हे मी नाही असे स्वत:चे समाधान तो सृष्टीकर्ता करून घेतो आहे आणि त्यावरच ही नश्वर सृष्टी सुरु आहे...या विश्वाची निर्मितीच मुळी अस्तित्वरूप भ्रमातून झालेली आहे....

निराकार, निर्विकार, निर्विकल्प, अतर्क्य,केवल अवस्था हेच खरे सत्य आहे....परंतु या त्याचे वैशिष्थ्य असे की येथे केवल सत्य आहे...मिथ्या असे काहीच नाही.... जर असेलच तर ती या जगताची जाणीव...
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या।

॥जय जय रघुवीर समर्थ॥

No comments: